कॅलिडोस्कोप

विविध रंगांचं.. आकारांचं..
विविध प्रतलांचं .. एक देखणं विश्व..

प्रकाशाच्या सानिध्यात साधे काचेचे तुकडे ही इतकी सुंदर निर्मिती करु शकतात याचं मूर्तीमंत उदाहरण. मला कॅलिडोस्कोपचं लहानपणापासून आकर्षण आहे. मी काही स्वत: जाऊन विकत घेतले आहेत वगैरे असं काही नाही. आमच्या वाड्यात एक घर होत. [ मी लहानपणापासूनच वाड्यात सर्व घरांमधे अप्रतिर्हत संचार करू शकत होतो. कारण मी एक तर सगळ्यात लहान आणि इतर माणसांचा (भाडेकरूंचा – हा शब्द मला तसा इथे चुकीचा वाटतो.) आवडता होतो. त्यामुळे मी कुठे ही असायचो. हां तर कुठे होतो मी ? हां कॅलिडोस्कोप.. तर आमच्या घरामागे त्याचं घर होतं त्यात एक चौकोनी कुटुंब रहायचं .. त्यातले काका शाळॆमधे गणित शिकवायचे आणि त्यांची दोन हुशार मुले व काकु. असं छान कुटुंब. तर ते काका मला अशा गमतीशीर गोष्टी दाखवायचे.. त्यानी मला एके दिवशी कॅलिडोस्कोप करून दिलेला. ]खरंतर खूप जुनी आठवण आहे ही.. मग त्याचा इथे काय संबंध.. आहे.

आज आम्ही मित्र मित्र एकाच व्यक्तीबद्दल बोलत होतो. पण प्रत्येकाच मत वेगळं. खूप चर्चा आणि वाद. मग तो हेच करत नाही .. तेच करतो.. तो शिस्तीत शेंडी लावतो, आतल्या गाठीचा आहे.. ब्ला.. ब्ला .. असं एकाच मत. दुसरा त्याच्या विरूद्ध .. आणि मी दोन्ही नाकारत त्याला फक्त व्यवहारी व मतलबी ठरवत होतो. आणि एकाबाजूला आतून वाटत होतं की खरं काय आहे ते खरंच मला माहित आहे ? मी ते शोधायला त्याच्या घरी गेलो .. आणि रंगच बदलले…त्याच्याबद्दल माझं आणि इतरांच मत जे होतं ते खरच होतं पण त्याला कारण ही वेगळं होतं.. असो..

साध्या फुटक्या बांगड्यांचे तुकडे, आरसे, टिकल्या यांचं वेगवेगळं असं किती अस्तित्व असतं? काहिच नाही. पण जेव्हा ते एकत्र येतात आणि त्यांच्या संपूर्ण सौंदर्याला प्रकाशात झोकून देतात. त्यावेळेस जे घडून येतं ते फक्त अनुभवण्यातच मजा आहे. माणसांचे स्वभाव गुण चेहरे.. हे कितिसे लक्षात रहातात आपल्या? पण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यासाठी काही तरी असते. त्यावेळेला हेच स्वभाव, गुण, चेहरे, काचेच्या तुकड्यांसारखे आपापले रंग बदलत रहातात.
मला वाटतं की प्रत्येक जण हा एका कॅलिडोस्कोपसारखाच आहे. जसा नजरेला दिसेल तसा तो आपल्याला भासतो. दु:खी, करूण, आनंदी, चांगला वाईट आणि विविध गुणांनी भारलेला .. कसाही.. असे अनेक कॅलिडोस्कोप मिळून हा विश्वाचा खेळ एक शक्ती खेळत आहे. मन-बुद्धी-शरीर या कॅलिडोस्कोपच्या भिंती .. ज्यातून आत्म्याचा प्रकाश आत बाहेर सहज ये-जा करु शकतो. प्रत्येकाचा स्वभाव, गुणवैशिष्ट्य हे काचेचे रंगीत तुकडे. आणि आपण करतो ते त्याचं परिक्षण..
प्रत्येक व्यक्तीला आपण आपल्या नजरेतून पहातो आणि त्यावरच मत बनवतो. त्या कॅलिडोस्कोपला आपण विविध दिशांनी हलवून जोखून पहातोच असं नाही. प्रत्येकाचे स्वभाव, रूप, मन लोभसवाणं असेलंच कसं? पण ते तसं का आहे? याचा आपण विचारही न करता त्या बद्दल मत बनवतो. प्रत्येकाचं स्वत:चं एक असं प्रतल असतं आणि ते फक्त तोच पाहू शकतो. इतर जे पहातात ते फक्त त्या व्यक्तीचे भास असतात.. त्यालाच माहित असतं आपण काय करत आहोत आणि काय करू शकतो. इतरांना लावता येतात ते अंदाज. पण हे करण्यापेक्षा आपण स्वत:च्याच रंगात प्रतलात गुंतलो तर .. होइल आत्मपरिक्षण..

About Veerendra

An entrepreneur, Design professional, run V – render studio. 10 years of experience with Wordpress, Web design, UI UX, Brand consulting. I do write, paint and shoot photos occasionally. I run https://www.youtube.com/veerendratikhe