पंचममय शाम

“कल क्या होगा किसको पता
अभी जिंदगी का लेलो मजा.. “

काल रात्री आर डी च्या चाहत्यांनी म्हणजे पंचम मॅजिक या संस्थेने आयोजित कार्यक्रमाला गेलेलो. टिळक स्मारक मंदिरात नऊ वाजताचा कार्यक्रम होता, पण माझे काम लवकर आटोपल्याने साडेआठलाच पोहोचलो, मला आयोजाकापैकीच एकानी बोलावले होते त्यामुळे पास मिळाला होता, आधीच आत जाऊन बसलो होतो .. आत गेलो तर एक ३०-४० टाळकी गप्पा मारत मारत काम करत होती .. सगळी माझ्यापेक्षा १०-२० वर्षांनी मोठी .. मला वाटल आता बोर होणार कार्यक्रम सुरु होईपर्यंत पण हळूहळू त्याच्या गप्पात मी कधी मिसळलो ते कळलेच नाही. स्टेजवर मोठा पंचमदांचा फोटो, त्याच्याजवळ स्क्रीन, कडेला स्टेन्डवर पंचमचेच तैलचित्र, काळे [ फक्त याच कार्यक्रमासाठी पंचमचे फोटो प्रिंट करून तयार केलेले ] टी-शर्ट घालून कामात गर्क असलेली माणसे, आणि मोठ्यांदा लावलेलं हे गाणं! त्यातही वेगवेगळया विषयावर आणि टाईमपास गप्पा व चहा! जो महोल तयार झाला होता तो खरोखर अवर्णनीय! आर. डी. मय झाला होत सर्व ..
हा खरोखर आर. डी. चा करिष्माच आहे कि फक्त एका माणसाच्या प्रेमापोटी, जो त्यांना आयुष्यात कदाचित भेटला असेल वा नसेल ही .. त्या माणसासाठी दर वर्षी दोनवेळा वेळात वेळ काढून ही माणसे एकत्र येतात व त्याच्या स्मृती जपतात. वय, व्यवसाय, स्वभाव याचा तसा काही संबंध नाही तरीही गेली दहा वर्षे ही लोक कार्यक्रम करत आहेत यांचा फक्त एकच भाव व देव – राहुलदेव बर्मन !

खर्चाचे भान नाही. कार्यक्रम हौशी [ व  थोडा व्यावसायिक ही ] पण तरीही ३ कॅमेरे शूटिंगसाठी , प्रकाशयोजना – ध्वनिव्यवस्था उत्कृष्ठ दर्जाची .. मूळ रेकॉर्डिंगचीच ध्वनिमुद्रिका ऐकविणे .. त्याचा जो होईल तो खर्च हे सर्व आहेच पण कार्यक्रमात सर्वजण कार्यकर्ते म्हणून वावरत होते हे विशेष..
जशीजशी कार्यक्रमाची वेळ जवळ येत होती तसे हवेत वेगळेच रसायन निर्माण होत होते.. लोकांची हळू हळू येजा सुरु झाली होती. याच मंडळींच्या घरातली लोक आता यायला लागली होती. मित्र परिवार येऊन भेटत होते. कार्यक्रमाला हळू हळू घरगुती मेळाव्याचे स्वरूप येत होते. पण एक जाणवल कि ही माणस फक्त याच कार्यक्रमाला भेटून ओळखीची झाली आहेत. दर वर्षी दोन कार्यक्रम आणि तोच उत्साह तेच वातावरण त्यामुळे लोक एक मेकांच्या परिचयाची झाली होती. आवर्जून एकमेकांना भेटत होती. खरच कमाल आहे ना!
मधल्या काळात पडदा पडला.. लोक आत यायला सुरु झाली होती. पहिली घंटा झाली .. मी दारासमोरच  बसलो होतो त्यामुळे त्या पंधरा मिनिटात इतक्या माणसाचे चेहरे पाहून झाले कि बस .. जशी वेळ जवळ येत गेली तशी माणसे आत येण्याचा वेग वाढत होता ते मी अनुभवले. दुसरी आणि तिसरी घंटा ही झाली आणि बरोब्बर नऊ च्या ठोक्याला कार्यक्रम सुरु झाला .

पहिली धून वाजली आणि सर्व प्रेक्षगृहातून कडकडाट आणि शिट्ट्या च्या गजरात पडदा उघडला .. आणि मिनिटभर लोक नुसता जल्लोष करत होती .. कार्यक्रम सुरु झाला ते आरडी ने गायलेल्या एका बंगाली गाण्याने. त्याच गाण्याने त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. स्टेजवर श्री. आचार्य आले होते जे त्या काळातले नावाजलेले सतार वादक होते व त्यांनी आर डी च्या काही गाण्यांना साथ दिली होती. त्यांच्या वादनाने मुलाखतीस सुरुवात झाली. त्यांचे व पंचमचे अनेक अनुभव पैलू कळले. तसेच त्या नंतर सतार वादक पंडित अशोक शर्मा व सरोदवादक श्रीमती झारीन शर्मा यांची मुलाखत झाली. सर्वचजण इतके भर भरून बोलत होते कि वेळ कसा सरतो आहे ते कळत नव्हते. एकामागून एक सरस गाणी .. त्यात त्या कलाकारांनी सांगितलेले त्या गाण्यांचे अनुभव .. एकदम मस्त अनुभव होता.
खूप ओळखीची अनोळखी गाणी ऐकायला मिळत होती. आणि त्यातून ओरिजिनलsoundtrack होते त्यामुळे त्याची मजा काही औरच होती.. छोटे नवाब पासून सुरुवात झाली आणि हळू हळू गोमती के किनारे, किताब, जवानी, खूबसूरत, घर, इजाजत, मासूम पर्यंत आम्ही येऊन ठेपलो. अतिशय सुरेख असा कार्यक्रम पाहिल्याच समाधान मिळाल.  मी परतलो मी गुणगुणतच! .

वरचे चित्र मी तयार केले आहे .. कसे झालेय ते सांगा जरूर !!

About Veerendra

An entrepreneur, Design professional, run V – render studio. 10 years of experience with Wordpress, Web design, UI UX, Brand consulting. I do write, paint and shoot photos occasionally. I run https://www.youtube.com/veerendratikhe

  • चित्र खरंच छान झालंय…ब्लॉगवर आल्यावर सर्वप्रथम या चित्राबद्द्लच विचार आला आणि शंकानिरसन अर्थातच वाचल्यावर..आर.डींची गाणी म्हणजे काय बोलणार…कुठलीही निवडली तरी रसिकांना पर्वणीच….आपण नशिबवान आहात…

  • चित्र एकदम सुरेख!

  • धन्यवाद अपर्णाताई व आनंदराव !