शुभ दीपावली

दीपावली
सण
प्रकाशाचा
आनंदाचा

रंगावली
दारी
दीपमाळा
उजळल्या

फराळासह
गप्पा
मित्रांच्या
आप्तांच्या

दंगलेली
मुलं
किल्ल्यात
फटाक्यात

तेजाळली
रात
अंधाराचा
नाश झाला

सर्वसुखाच्या
सवे
दीपावली
सण आला

वीरेन्द्र तिखे
नरक चतुर्दशी,
१०/११/२०१५

शोध

खूप दिवसानी
आज कविता शोधत होतो ..
कपाटात, डेस्कवर, फडताळात
पण काही केल्या मिळेचना..
मन हळू हळू सैरभैर
आतून कल्लोळ माजला ..
कविता हरवली ..
कविता हरवली ..
शोधावेग वाढला
आवाज ही ..
त्यातून एक आवाज घुमला
मी कुठ्ली हरवते? तूच हरवला होतास
मला मागेच सोडून भलतीकडे भरकटलास
मीच आले लपून तुझा माग घेत
कुणी दुसरी नाहीना भेटली याचा शोध घेत ..

आता पुन्हा लिही , मन तुझ चांगलंय
हे वेड्यासारख भरकटण कधी कुणाला चुकलंय ?